खाऊ गल्ली , गिरगावच्या खानावळी अन थाळ्या..

खाऊ गल्ली , गिरगावच्या खानावळी अन थाळ्या..
गिरगावात जाणं आता कमी झालंय. पूर्वी तीन वर्षं ऑफिस गिरगावात होतं, नंतर चार वर्षं लॅमिंग्टन रोडवर म्हणजे गिरगावच्या मागेच. पुढे २४वर्षं बोरीबंदरला तर अडीच वर्षं काळबादेवीत ऑफिस होतं. म्हणजे जवळपास ३५ वर्षं गिरगांवच्या परिसरात. त्यामुळे तिथल्या शाकाहारी व मांसाहारी रेस्टॉरंटची चव जणू पाठ झाली होती. राजा राममोहन रॉय रस्त्यावरचं व्हॉइस ऑफ इंडिया, पुढे श्रीराम बोर्डिंग, मॉडर्न लंच होम, ठाकुरद्वार नाक्यावरलं सत्कार, चिरा बाजारातलं चर्च रेस्टॉरंट, खत्तर आळीतलं मराठी खानावळ, अग्यारी लेनची मराठा खानावळ आणि नंतर सु्रू झालेली मालवणी स्वाद, सायबिणी गोमांतक अशी किती तरी. यात शाकाहारीचा उल्लेख केला तर आणखी ४० रेस्टॉरंटची नावं तरी लिहावी लागतील. तरीही अद्याप सु्रू असलेल्या चाफेकर, पणशीकर, कोल्हापुरी चिवडा, विनय, मनोहर, मेवाड, प्रकाश दुग्ध मंदिर, तांबे, न्यू आनंद भुवन, सेंट्रल लंच होम, राजा, बंद झालेले वीरकर, कोना, मॉडर्न आणि मांसाहारी अनंताश्रम, लीलाधर ही यादीही मोठी होईल. 
 गिरगाव चर्चच्या रांगेत पुढे असलेलं श्रीराम खूप जुनं आणि मासे खाणाऱ्याचं अत्यंत प्रिय व आवडतं ठिकाण. सर्व प्रकारचे मासे, त्यांचं कालवण वा तव्यावर तळलेले त्यांचे तुकडे तिथं मिळतात. जणू गोपी टॅंकचा मासळी बाजारच. कोळंबी, पापलेट,बांगडा, तिसऱ्या, रावस, जिताडा, जवळा, मोरी, माकूळ, सुरमई, हलवा, खेकडे अगदी सर्व. सर्वांचं कालवण एका प्रकारचं नसतं. त्यामुळे माशानुसार चव बदलते. मासे न खाणाऱ्यांसाठी चिकन आणि मटण यांचे असंख्य प्रकार यांच्या मेन्यूमध्ये आहेत. इथं जेवायला मांसाहारी लोकच येतात, पण त्यांच्यासोबत येणाऱ्या शाकाहारीसाठीही बरेच प्रकार आहेत.
 
 गिरगावात थाळी हा प्रकार लोकप्रिय. नव्या मांसाहारी रेस्टॉरंटपेक्षा श्रीराम बरंच स्वस्त आहे. चर्चच्या आधी नाक्यावर व्हॉइस ऑफ इंडिया हे मस्त आणि स्वस्त रेस्टॉरंट. अनेक मित्रांच्या सुलेमानी चहा पीत मैफली रंगण्याचं हे ठिकाण. इथलं मटण व चिकन अप्रतिम. फक्त तेल कमी असं सांगावं लागतं. अन्यथा मटण वा चिकन मसालामध्ये वर तवंग दिसू लागतो. ऑम्लेट पाव खाण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी. काही जण इथं येऊन चमच्याने नुसती अंडा भुर्जीच खातात. त्याच्या शेजारीच शाकाहारी मंडळींसाठी मनोहर आहे. तिथली पाव भाजी खूप प्रसिद्ध. पाव भाजीसाठी ते जो चटणीसारखा मसाला तयार करतात, तो तर अप्रतिम. त्याच्या पलीकडे मेवाड हॉटेल. तिथं दुपार झाली की गरमागरम मिसळ आणि ताजे पाव खाण्यासाठी तिथं गर्दी असते. खिशात कमी पैसे असले की तेच आसरा. त्याच्यासमोर पारशाचं कॅफे डे ला पेक्स. ते खूपच शांत.
 चर्चच्या समोर मॉडर्न लंच होम. छोटंसं, पण जेवण उत्तम आणि दरही बऱ्यापैकी वाजवी. अनेक जण इथं सुरमई थाळी वा बोंबील थाळी मागवतात. काही जण फक्त मांदेली थाळीचे शौकीन. इथंही श्रीराम बोर्डिंगप्रमाणे समुद्रात सापडणारे सर्व जीव मिळतात. मटण थाळी, चिकन थाळीही आहे. थाळी घेणं परवडतं. तीन चार जण गेले तर माशांचे दोन प्रकार, एखादा चिकन वा आवडीनुसार मटणाचा प्रकार असले तर जिभेचे चोचले एकदम पूर्ण होतात. नीर डोसा व चिकन खूप मस्त. पंजाबी व चायनीज प्रकारही मिळतात. गिरगाव नाक्यावरली ही ठिकाणं विसरून चालतच नाही. चर्चकडून जगन्नाथ शंकर शेट मार्गावर काळबादेवीच्या दिशेला चालू लागलात की एक किलोमीटरवर नाथ माधव पथावर खत्तर गल्लीपाशी आहे मराठी खानावळ. इथलं जेवणही उत्तम. इथली जवळा भाजी, जवळा फ्राय, खेकडा मसाला, बांगडा, पापलेट, सुरमई असलेली त्यांच्या भाषेत ‘मच्छी कढी‘ खास. इथली चिकन वा मटणची बिर्याणी ही लखनवी किंवा हैदराबादी बिर्याणीपेक्षा पूर्ण वेगळी, तिखट. इथलं मटण, चिकन व वडे खूपच छान.

 शाकाहारी हवं असेल तर जगन्नाथ शंकर शेट रोडवर आसपास पणशीकर आणि कोल्हापुरी चिवडा आहे आणि ठाकुरद्वारात वैद्य वाडीत बी. तांबे यांचं सुजाता आहे. ठाकुरद्वारातच विनय हेल्थ होम. प्रचंड मेन्यू आहे तिथं. या चारही ठिकाणी मिळणारे वडा, पियुष, मिसळ साबुदाणा वडा हे चार पदार्थ मन तृप्त करतात. ठाकुरद्वारात, म्हणजे बॅ. बाबासाहेब जयकर मार्गावर शिरलात की लगेच डाव्या बाजूला आहे सत्कार रेस्टॉरंट. तेही अर्थातच मांसाहारी. मत्स्यप्रेमी मंडळींचं विशेष आवडतं. सत्कार नावाचं माशांसाठी प्रसिद्ध रेस्टॉरंट गोरेगाव पूर्वेला स्टेशनसमोर आहे. विलेपार्ले पूर्व, डोंबिवली पूर्व आणि अगदी ठाण्यातही सत्कार नावाची मांसाहारी रेस्टॉरंट्स आहेत. काही शाकाहारी सत्कारही आहेत. तर ठाकूरद्वारच्या सत्कारमध्ये चिकन व मटणाचे असंख्य प्रकार आहेत. अशा ठिकाणी मासे वा मटण, चिकन थाळी घेणंच परवडतं. शाकाहारी मंडळींसाठी काळ्या वाटाण्याची उसळ व अन्य अनेक प्रकारही आहेतच. पुढे काळबादेवीच्या दिशेने जाताना दादीशेठ अग्यारी लेनच्या परिसरात मराठा हॉटेल आहे. ते मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध. कोळंबीची खिचडी, बोंबलाची भजी, वजडी यासह सर्व प्रकारचे मासे आणि चिकन व मटणाचे खूप प्रकार या मराठा हॉटेलमध्ये मिळतात. जवळच्या मांसाहारी रेस्टॉरंटपेक्षा इथले दर आणखी कमी आहेत आणि चव छान. इथंही वेगवेगळ्या माशांची थाळी तसंच मटण, चिकन व अंड्याची करी वा ऑम्लेट असलेली थाळी घेतली तर खूप स्वस्त पडतं. थाळी घेतली तर सुमारे अडीचशे/तीनशे रुपयांत दोघांचं जेवण होतं.

 त्याच परिसरात आहे सेंट फ्रांसिस झेविअर स्ट्रीट. त्या स्ट्रीटच्या तोंडावरच चर्च रेस्टॉरंट आहे. तिथं जवळच सेंट झेविअर चर्च असल्यानं रेस्टॉरंटच्या नावातही चर्च आलं आहे. बरंच जुनं रेस्टॉरंट. बाहेरून ते इराण्याचं असावं असं वाटतं. हेही सामान्यांना परवडणारं ठिकाणं. इथं जेवणात मासे आहेत.पण मटण, खिमा, मटण करी,सुकं मटण,चिकन व अंड्याचे अनेक प्रकार मिळतात. इथंही जेवण स्वस्तात होतं. लॅमिंग्टन म्हणजे भडकमकर मार्गावर असाल तर मांसाहारीसाठी अमृत पंजाब आणि शबनम रेस्टॉरंटला तर शाकाहारीसाठी घसीटाराम हलवाईला नक्की भेट द्यावी.
 गिरगाव परिसरात मासे, मटण, चिकन थाळी व पदार्थ देणारी बरीच रेस्टॉरंट होती. आता गिरगावातली मराठी लोकसंख्या कमी होत आहेत. शाकाहारी व जैन खाद्यपदार्थांचा प्रभाव वाढतोय. मरिन लाईन्स परिसरात गोवन ख्रिश्चनांची अनेक रेस्टॉरंट होती. तिथं विंदालू, सोर्पोतेल असे पोर्तुगीज गोवन पदार्थ मिळत. त्यातील काही शिल्लक आहेत. त्यांच्याविषयी पुन्हा कधी तरी.

#mumbai #girgaonkar

🔱🕉️श्री क्षेत्र कुणकेश्वरचा कळसाध्याय !

🔱🕉️श्री क्षेत्र कुणकेश्वरचा कळसाध्याय !

श्री क्षेत्र कुणकेश्वराचे महात्म्य हे पिढ्यानपिढ्या मागे जाऊन किंवा स्कंद आणि संगमेश्वर पुराणातून वाचून तुम्हाला नक्की पुण्यवान बनवेल, पण वर्तमानात जेव्हा निळ्याशार सागरांच्या लाटा किनाऱ्यावर धडकताना  शिव मंदिराच्या भव्य वास्तूतून जेव्हा  वाचायला घ्याल तेव्हा  त्या राजवैभवाचे गंडभेरुड तुम्हाला वर्तमानाच्या सामर्थ्याची ताकद देईल.. मला कुणकेश्वराच्या मंदिरावरचे गंडभेरुड प्रचंड ताकद देते.  हातापायाच्या नख्यात हत्ती सिंहाना चिरडुन धरणारा गरुड हे चित्रच ह्या शिवमंदिराच्या  अभेद्यतेची ताकद दर्शवणारे चित्र आहे.  कुणकेश्वर मंदिराचे स्थापत्य हे भारतातल्या मंदिर स्थापत्यातले अनोखे शिल्प आहे. ती भव्यतमता जशी पुराणाने आलीय तशीच ती स्वराज्यसंवर्धक इतिहासाने आलीय हे ही तेवढेच खरे आहे.

कोकणची दक्षिण काशी असा उल्लेख असलेल्या श्रीक्षेत्र कुणकेश्वरचा महाशिवरात्री उत्सव म्हणजे साक्षात कैलासाधिपती जगदअधिपती श्री शिवशंकराचा कोकण सोहळा.. कोकणातल्या आई सातेरीच्या वारुळ पेडाचे पावर्तीतत्व ,  कोकणच्या गणेशोत्सवाचे गणेशतत्व आणि कुणकेश्वराच्या शिवरात्र उत्सवाचे मिळून जे संपूर्ण शिवमहिम्न आहे तेच या लाल तांबड्या मातीचे वैभव आहे. तोच अंगारा आहे आणि तोच निळाईचा आसमंत आहे.

श्री कुणकेश्वर म्हणजे कोकणचा अधिपती.. अतिप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी... कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. आणि देवाच्या नावावरुन गावाच्या नावालाही पुण्यपावनपणा लाभलेलं हे कुणकेश्वर गाव... ११ व्या शतकापासून कोकणचाच नाही तर वसुंधरेचा साज असेलेलं हे देखण शिवक्षेत्र अरबी समुद्राच्या काठी कैलासाची अनुभूती देत आजही आपल्या शिवभक्तांना वरद देत आहे.. 

साक्षात कुणकेश्वराचा अधिवास हा या कोकणच्या भुमीला शिवभूमी बनवत आहेच पण दैखण्या स्थापत्यकलेनं नटलेलं श्री क्षेत्र कुणकेश्वराचे मंदिर हे शिवशंभोसोबत शिवछत्रपतींच्या शिवभक्तींचीही गाथा सांगणारे आहे. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत कुणकेश्वर क्षेत्री भेट देऊन शिवशंभोची पुजा केली होती. शिवछत्रपतींच्या पश्चात स्वराज्य वाचवण्याच्या लढाईत श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराने स्वराज्याला दिलेलं बळ हा एक काळाच्या पानात दडलेला इतिहास आहे. 

त्याकाळी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक असणार्‍या नारो निळकंठ अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा विजयदुर्गपासूनचा सागरी प्रदेश होता. नारो निळकंठांची श्री कुणकेश्वरावर अपार श्रद्धा होती. मुघल सल्तनतीपासून श्री कुणकेश्वराचे मंदिर वाचले पाहिजे यासाठी नारो निळकंठ यांनी प्रचंड सुरक्षा लावली होती. 
आणि त्याचवेळी  औरंगजेबाचा पुत्र शहाआलम हा घाट उतरुन या तळकोकणात आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कुणकेश्वर मंदिर हे एक डोळ्यांत भरणारे मोठे तिर्थक्षेत्र होते. त्यामुळे कुणकेश्वर मंदिराला शहाआलम त्रास देईल अशी भिती नारो निळकंठांना वाटू लागली. 

नारोपंतांनी आपल्या आराध्य दैवताच्या रक्षणासाठी उपाययोजना सुरु केली. स्थानिक कुणकेश्वरांच्या ग्रामस्थांसोबत मराठा सैन्याने हिंदुच्या या पावनक्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारली..  छोट्याश्या सैन्यबळासह नारो निळकंठ अमात्य यांनी  श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या रक्षणासाठी छातीचा कोट केला .

पण तरिही शहाआलमची नजर कुणकेश्वर मंदिरावर पडली. त्याने कुणकेश्वर मंदिरावर जोरदार हल्ला चढविला. मंदिराभोवतीच्या तटबंदीच्या आधारे आपल्या तोकडया बळानिशी मराठयांनी कडवा प्रतिकार केला. पण शहा आलमचा तडाखा भारी पडला. पण लढाई स्वराज्याची होती आणि तीही श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या रक्षणाची होती.  मंदिरासभोवती थेट मैदानातल्या हाराकीरीमुळे शहाआलम मनात खुष होता. पण त्याचवेळी कुणकेश्वर मंदिराच्या कळसात आपला काळ बसलाय याची कल्पनाच शाह आलमला नव्हती.. त्याच कळसात लढवय्या मराठ्यांची एक तुकडी लपून बसली होती.. मुघल फौजेला काही कळण्याच्या आत कळसातून जयभवानी जयघोष करत नारोपंतांनी कळसातील गुप्त जागेतून बाहेर उडी मारत तलवार उपसली.. स्वताच्याच गुर्मीत असलेल्या मुघल सैन्याला कळसातून हर हर महादेवाच्या जयघोषात तलवारी खणाणल्या.. मोगल सैन्यावर मराठे तुटुन पडले.. मराठ्यांचा रौद्रअवतार पाहून मुघल सैन्य पळून गेले.. त्या कळसातून तलवारीच्या रुपातून जणू त्रिशूळ रोखले गेले.. मराठ्याच्या इतिहासात कुणकेश्वर मंदिराच्या कळसातील लढाई म्हणजे कळसाध्याय आहे.  स्वराज्यसंघर्षातला मंदिराच्या कळसातला हा गनिमी कावा मुघलांना धडकी भरवणारा होता. 

या लढाईने शिकवलेला धर्म हा हृद्याला स्पर्शणारा आहे. मुघल सैन्याने मंदिर परिसरातही बरेच नुकसान झाले होते. जीवापाड जपलेल्या एकीकडे  माझ्या कुणकेश्वर मंदिरासमोर धर्मविरोधी कारवायांवर विजय होत होता आणि दुसरीकडे माझ्या मंदिरावर झालेला हल्ला याचे दुख नारो निळकंठ अमात्य यांना सहन झाले नाही आणि मंदिराशेजारच्या विहीरीत शिवशंभो म्हणत आत्मार्पण केले.. आजही नारो निळकंठ अमात्य यांची समाधी कुणकेश्वर मंदिर परिसरात त्याची साक्ष देत आहे.  आजही  कुणकेश्वरच्या पालखीच्या वेळी म्हटली जाणारी आरती ही अमात्य नारोपंतानीच लिहीलेली आहे. या आरतीतही नारोपंडितांच्या उडीचा स्पष्ट उल्लेख आहे.

आज हिंदु धर्म रक्षणाच्या लढ्यात अनेक योद्ध्यांचा उल्लेख करण्यात येतो. पण कुणकेश्वर मंदिर कळसात लपलेल्या मराठा योद्ध्यांचा उल्लेख म्हणजे कुणकेश्वरची एक विजयगाथा आहे, आणि हीच विजयगाथा महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज स्मरण कऱण्याची वेळ आली आहे. 

ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव 

#shivshankar #mahashivratri #mahadev 
#mahakal #shivratri