जय शिवराय.....

बरोब्बर सव्वातीनशे वर्षे झाली त्या होळीला...पुण्याजवळच...१० कोसांवर भीमा नदीच्या तीरी दोन गावे आहेत आमने सामने...वढू आणि तुळापूर...अतीशय रम्य परिसर...झोकदार वळण घेऊन वाहणारी जणू दुसरी चंद्रभागाच...तिच्या तीरावर ती होळी सुरु होती....
आपला राजा, रयतेचा तारणहार, यवनांचा कर्दनकाळ, हिंदुस्थानवर धर्मरक्षणाचे मजबूत छत्र धारण केलेला छत्रपती, शंभूमहादेवाच्याच प्रलयंकर रुपाचे अवतार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भटक्या कुत्र्यांच्या तावडीत बेसावध सिंह सापडावा तसे औरंग्याच्या कचाट्यात सापडले होते...सापदतात कसले, फ़ंदफ़ितुरीचा छंद लागलेल्या स्वकीय नातेवाईकानेच दिलेल्या माहितीमुळे अनाहुतपणे फ़सवले गेले होते.
आणि त्या वखवखलेल्या लांडग्यांनी सुरु केली ती होळी...रोज एक एक अवयव कलम करीत शंभुराजांना इस्लामच्या जाळ्यात ओढण्याचे हजार यत्न त्यांनी करून पाहिले...पण छे! अहो जो राजा केवळ ९ वर्षात १३० लढायांमध्ये महा पराक्रमाने विजय संपादन करून एका वेळी १०-१० शत्रुंशी टक्कर घेऊन त्यांना मातीत मिळवून बसला होता तो असल्या भ्याड कृत्यांनी आपला धर्म बदलेल? कालत्रयी अशक्य! एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण सच्चा धर्मभक्त हिंदू अन्य धर्माचा स्वीकार करणार नाही!
शेकडो लढायांमध्ये शत्रूच्या रक्ताने होळी खेळलेला हा महायोद्धा आज मात्र स्वत:च्याच रक्ताने माखला होता...अंगावरची संपूर्ण कातडी सोलली गेली होती...पुन्हा खपल्या धरल्या तर त्याही काढून यवन आपल्या पाशवी वृत्तीचा परिचय देत होते...त्यांना हेच कळत नव्हते की ते शंभूराजांना नाही तर हिंदू धर्माला डागण्या देत आहेत! खवळलेला हिंदू समाज पुढे याच औरंग्याला दक्खनच्याच मातीत गाडून अटकेपार भगवा घेऊन गेला ते काय उगाच की काय?
त्याही भीषण परिस्थीतीत एका सच्च्या मित्राप्रमाणे त्यांना साथ देणारे कवीराज कलश हेही कैद होते...प्रत्येक पाशवी अत्याचार त्यांच्यावरही केला जात होता...
तशातही न डगमगता त्यांनी या होळीचे वर्णन आपल्या शीघ्रकाव्यात करून ठेवले!
अरे!
यावन रावन की सभा....शंभू बंध्यो बजरंग......
त्या दुष्ट रावणाच्या सभेत जसे हनुमंताला बंदी करून आणले होते ना तसे या लांड्यांनी आज माझ्या शंभूराजाला बंदी केले आहे!
लहु लसत सिंदुरसम....खूब खेल्यो रणरंग.....
पूर्वी शत्रूच्या रक्ताने होळी खेळलेल्या या राजाचे सर्व शरीर आज लसलसणा-या जखमांतील रक्ताने माखून, लाल शेंदूर फ़ासलेल्या हनुमंतासारखेच सारखेच लाल बुंद झालेले आहे!
ज्यों रवि छवी छलत ही, खद्योत होत बदरंग....
सूर्य उगवल्या उगवल्या जसा काजवा निस्तेज होऊन जातो....
त्यों तुव तप तेज निहार तखत तजों अवरंग....
अरे राजा अगदी तसाच तुझ्या तेजाचा प्रखर आविष्कार सहन न झालेला हा औरंग्या तुझ्याकडे बघवत नसल्याने खाली मान घालून बसलाय! नमाज कसला पढतोय हा! घाबरलाय तुला!
स्व-धर्मापुढे काय तुच्छ लेखलं असेल या महावीरांनी आपल्या जीवनाला !
कोटी कोटी सलाम या निर्भय निडर वृत्तीला! ही होळी शंभूराजे खेळले नसते तर आज आपल्याला होळी खेळायची संधीच मिळत नव्हती मित्रांनो, हे इतिहासपूत सत्य कायम ध्यानात ठेवा! खरेतर हा बलिदान मास दु:खाचा महिना...या काळात हिंदूंनी काहीच आनंदाचे सण समारंभ करू नयेत..
आपल्या बापाचे सुतक असताना जसे आपणा हे नियम पाळतो ना तसेच या हिंदू धर्माच्या बापासाठी, शंभू राजांसाठी आपणा करू तितका त्याग थोडाच आहे...
परंतु निदान होळी खेळताना, रंग उडविताना इतके तरी ध्यानात राहू द्यावे की माझ्या राजाने स्वत:च्या रक्ताने होळी खेळली म्हणून आज आम्ही ही होळी ३२५ वर्षांनंतर सुद्धा निर्धोकपणे खेळतो आहोत!
होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...आणि शंभू छत्रपती व कविराज कलशांना लक्ष लक्ष प्रणिपात...

जय भवानी जय शिवराय जय शंभुराय।।🚩🚩🚩

No comments:

Post a Comment