Showing posts with label आदिशक्तीच्या रुपाची ओळख. Show all posts
Showing posts with label आदिशक्तीच्या रुपाची ओळख. Show all posts

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे नववे रूप 'सिद्धीदात्री'

सिद्धगन्धर्वयक्षारसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धीदा सिद्धीदायिनी।।

दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणार्‍या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते.

अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक 'अर्धनारीनटेश्वर' या नावाने ओळखतात.

देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फूलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे.

देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

दसरा साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास :->

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे आठवे रूप 'महागौरी'

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:।
महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।। 


दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्‍यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।' तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत. 

महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे. 

आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता-
जन्म कोटि लगि रगर हमारी।
बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।

या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री'

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरी‍रिणी।।
वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।।

दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.

या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत.

कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे.

कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.

मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्‍या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे सहावे रूप 'कात्यायनी'


दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्‍या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते.

दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.

काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे.

कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्‍णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल
आहे. तिचे वाहन सिंह आहे.

कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता'

सिंहासनगता नित्य पदमाश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।

दुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे म 'विशुद्ध'चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते.

भगवान स्कं 'कुमार कार्तिकेय' नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे.

डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.

नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्ल‍ीन होते. यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे.

स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही.

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे चवथे रूप 'कुष्मांडा'

सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च।
दधाना हस्तपदमाभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु में।

दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते.

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.

या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.

कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्‍ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे तिसरे रूप 'चंद्रघंटा''

पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।।
प्रसाद तनुते महां चंद्रघंटेती विश्रुत।

दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे ना 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे म 'मणिपूर'चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे तीला 'चंद्रघंटा देवी' असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तीचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते.

माँ चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माँ भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तीचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तीच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या माँ देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते.

आवाजात मधुरता येते. माँ चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा. तीची उपासना केल्यामुळे सर्व संसारीक संकटातुन मुक्ती मिळते. आपण नेहमी तीची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे. इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तीचे लक्ष आहे.

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे दुसरे रूप 'ब्रम्हचारिणी'

दधाना करपदमाभ्यामक्षमालाकमंडलू।
देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।।

नवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या‍ दिवशी साधकाचे मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणार्‍याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे.

तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या देवीला तपश्चा‍र‍िणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात.

एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता. या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला 'अपर्णा' हे एक नाव पडले.

अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दु:खी झाली होती. तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी 'उमा' अगं! नको ग नको! अशी हाक दिली. तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे 'उमा' हे एक नाव पडले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले, की 'हे देवी! आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पत‍ी रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.' असा वर त्यांनी दिला.

ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे.

आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री'

नवरात्र साजरे करण्यामागचे कारण मार्कंडेय पुराणांतर्गत देवी महात्म्यात सांगितले आहे. जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढून ते इतरांना त्रास देऊ लागतात तेव्हा सज्जनांना त्रासमुक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचे स्थान पुन्हा मिळवून देण्यासाटी शक्तीदेवता या धरतीवर अवतीर्ण होते. दुष्टांच्या निर्दालनासाठी देवीने अनेक अवतार घेतले.

सामान्यजनांना, विद्वानांना तिने पुन्हा सुख प्राप्त करून दिले. तिच्या या कर्तृत्वाबद्दल तिचे स्तवन व स्मरण करण्यासाठी नवरात्र साजरे केले जाते.
एका प्रसंगात देवीनेच सांगून ठेवले आहे, ''मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहीन. संकटकाळी अनन्यभावाने मला शरण येताच मी प्रकट होऊन तुम्हास दुःखमुक्त करीन मी तुमच्यावर सदा प्रसन्न असावे म्हणून प्रत्येक अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस घटपूजा, होमहवन वगैरे प्रकारांनी माझे पूजन करावे. माझ्यावर अचल निष्ठा ठेवून संकटसमयी जे माझी करूणा भाकतील त्यांच्या सुखासाठी मी सदैव जपत राहीन'' यावरून नवरात्र पाळण्याची परंपरा निर्माण झाली असावी, असे म्हणण्यास वाव आहे.

नवरात्रीतली प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या पुढील नावावरुन प्रचलित आहे.

पहिली रात्र - शैलपुत्री
दुसरी रात्र - ब्रह्मचारिणी
तिसरी रात्र - चंद्रघंटा
चौथी रात्र - कुश्‍मांदा
पाचवी रात्र - स्कंदमाता
सहावी रात्र - कात्यायनी
सातवी रात्र - कालरात्री
आठवी रात्र - चामुंडा
नववी रात्र - सिध्दीदात्री

या आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख आपण रोज करून घेणार आहोत


दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.

या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.

एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे.

परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.

सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दह‍ी वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले.

आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्‍याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.