आपल्या बापाचं काय जातं
असं म्हणणारी एक जमात आहे.
रस्त्याला पडलेला मोठा खड्डा असो
किंवा नाक्यावर चालणारा दारूचा अड्डा असो
माझ्या घराला कुंपण आहेच
आपल्या बापाचं काय जातं.
रस्त्यावर लहानगं पोरगं भिक मागतं
माझं पोरगं इंग्लीश शाळेत जातं
आपल्या बापाचं काय जातं.
मोर्चे निघतात बंद पुकारतात
जाळपोळीत सारे निरपराध मरतात
मी दारे खिडक्या लावून असतो
आपल्या बापाचं काय जातय.
दिवसा ढवळ्या कळ्या कुस्करल्या जातात
बलात्काराच्या बातम्या रोजच झळकतात
सकाळच्या चहा सह मी वाचत असतो
माझ्या आया बहिणी सुरक्षित आहेत
याच भ्रमात मी नांदत असतो
आपल्या बापाचं काय जातय.
रोजच शेतकरी शेतात राब राब राबतो
धान्याला भाव मिळत नाही म्हणून
शिवारातल्या झाडाला लटकतो
माझ्या घरी वाण्याकडून धान्य घरपोच होतय
आपल्या बापाचं काय जातय.
शेजारीच कुणीतरी मरण भोगत असतो
माझ्या दारावरचं तोरण मी आनंदाने पहात असतो
आपल्या बापाचं काय जातय.
दहशतवादी हल्ले रोजच होतात
जवान आपले नाहक मरतात.
मी आपला श्रद्धांजली वहातो
हुतात्मा होणं फक्त त्यांचंच कर्तव्य समजतो
आपल्या बापाचं काय जातय.
आपल्याच बापाचं खूप काही गेलेलं
कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो.  
आपल्याच घरचा वासा नकळत जळालेला असतो.

शैलेन्द्र

No comments:

Post a Comment