सुप्रभात आणि शुभदिवस...

दाट धुक्याच्या पदरा आडून
रंग गुलाबी आला
अंधाराचे कवच भेदूनी
सूर्योदय झाला ||१||

हळूच वारा झोंबे अंगा
कडकडणारी थंडी
स्वैर मनाला भुरळ घालते
दवबिंदूची धुंदी ||२||

दूर कुठेतरी झाडावरती
किलबिल करती पक्षी
मंद वाहतो पहाट वारा
गंध ठेवूनी वक्षी ||३||

कुठेतरी मग किणकिण करते
घंटा देवाघरची
पसरत येतो गंध धुपाचा
श्रध्दा देवावरची ||४||

उठा मंडळी सकाळ झाली
सांगत आहे सृष्टी
प्रसन्न होवून चला झेलण्या
दयाघनाची वृष्टी ||५||

सुप्रभात आणि शुभदिवस...

No comments:

Post a Comment