नातं म्हणजे काय ?
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, "पोस्टमन ssssss"
आतून एका मुलीचा आवाज आला,. "जरा थांबा, मी येतेय"
दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे"
आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते"
पोस्टमन, "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल"
पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.

असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.

रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे "दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी) मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे. पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा"
घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.

दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून  कर्ज हवे आहे"
साहेब म्हणाला," अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?
पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत."
साहेब : "पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी?
पोस्टमन : "साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे.

साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!

नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही ! तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही !!

No comments:

Post a Comment