आपल्या बायको बद्दल गर्व बाळगा !!

आपल्या बायको बद्दल गर्व बाळगा !!
प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता
तुम्हां रसिक वाचकांसाठी..........
("चांदणझुला" मधून... )
"बायको"
तिचं आपल्या आयुष्यात येणं,
किती किती सुखद असतं..!
या नात्याला श्वासांशिवाय,
दुसरं कुठलंच नाव नसतं...!!
एका सुंदर क्षणी आपल्या,
घरामध्ये येते "ती"...!
तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला,
भेट म्हणून देते "ती"...!!
किती सहज बनवत जाते,
ती प्रत्येकाशी नातं....!
बघता बघता अनोळखी घर,
तिचंच बनून जातं....!!
सुखामध्ये दुःखामध्ये,
'ती'च सोबत असते ना..!
सगळं सहन करून ती,
तुमच्यासाठीच हसते ना.?..!!
सकाळपासून रात्रीपर्यंत,
राबत असतात तिचे हात...!
सासू-सासरे, मुलं, घर..
सतत असतं तिच्या मनात...!!
चहा, दूध, नाष्टा, डबे,
आंघोळीला गरम पाणी...!
प्रत्येकाची करून कामे,
तिची मात्र मधाळ वाणी....!!
सगळ्यांत शेवटी झोपते ती,
सगळ्यांच्याही आधी उठून...!
दिवसभर राबण्यासाठी,
ताकद एवढी आणते कुठून.?..!!
घरामधलं सगळं आवरून,
कामांसाठी बाहेर पळते....!
घरामध्ये नसते तेंव्हाच,
तिची खरी किंमत कळते...!!
घर होतं अस्ताव्यस्त,
घरामध्ये नसते जेंव्हा....!
तिच्याशिवाय व्हायचं कसं...?
मनात आपसूक येतं तेंव्हा...!!
म्हणूनच ती परत येते,
घरामध्ये पदर खोचून....!
बोलून दाखवते मलाच ती,
वरती हे टोचून टोचून...!
की, "मी म्हणून टिकले..., दुसरी
केव्हाच गेली असती पळून....!
माझे महत्त्व येत नाही,
अजून कसे तुम्हांला कळून.?"..!!
राग-लोभ, रुसवे-फुगवे,
उणी-दुणी, मानपान...!
प्रत्येकाला घेते समजून,
जुळवून घेते कित्ती छान...!!
थकूनभागून आल्यावर ती,
हसून, चहा देते आणून...!
दिवसभराचे आपले कष्ट,
अलगदपणे घेते जाणून..!!
आयुष्यभर उपयोगी पडतं,
नेहमी तिचंच संसारी धोरण....!
म्हणून प्रत्येक घरात सजतं,
"बायको" नावाचं मखमली तोरण....!!
ती आहे म्हणून आहे,
आपल्या घरादाराला किंमत....!
तिला विरोध करण्याची इथं....
कुणात आहे हिंमत.?..!!
कुठून येतात आयुष्यात आपल्या,
इतक्या समजूतदार मुली.?..!
उगाच नाही म्हणत...
" घरोघरी मातीच्याच चुली...!!"
क्षणांचीही साथ नव्हे,
साताजन्मांची ही सोबत असते....!
"नवरा" आयुष्यभर "नवरा"च राहतो,
"नवरी मुलगी" मात्र "बायको" बनते....!!
👣👣👣👣👣👣👣👣
Dedicated to all Ladies

No comments:

Post a Comment